भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती
*आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित #लता_मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी २०२२) वृद्धापकाळानं निधन झालं.*
लता मंगेशकर यांचा अल्पपरिचय.
जन्म. २८ सप्टेंबर १९२९ इंदोर येथे.
लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. लता मंगेशकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण दिनानाथ यांच्या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले होते आणि १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
आपल्या वडिलांच्या मराठी संगीत नाटकात त्यांनी पाचव्या वर्षी काम सुरू केले.
वयाच्या १३ व्या त्यांनी किती हासाल या चित्रपटात नाचू या गडे खेळु सारी मनी हौस भारी हे गाणे म्हटले. मात्र त्याचा समावेश झाला नाही.१९४२ मध्ये पाहिती मंगळागौर या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणेही गायले. गजाभाऊ या मराठी चित्रपतात माता एक सुपुत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले.
लता दीदी १९४३ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास भिंड बझार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे सुरवात केली. वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे (१९४६) पा लागून कर जोरी हे गीत त्यांनी गायले. त्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.१९४५ बडी माँ या चित्रपटात त्यांनी माता तेरे चारणोमे हरभजन म्हटले.
लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती व २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होते. 'एक प्यार का नगमा है', 'राम तेरी गंगा मैली', 'एक राधा एक मीरा' आणि 'दीदी तेरा देवर दीवाना' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमागे लता मंगेशकर यांनी आवाज दिला.
लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या गायिका होत्या.त्यांना २००९ मध्ये ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार पुरस्कार 15 वेला तर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार चार वेळा पटकावला. त्यांना फिल्मफेअर कडून दोनदा विशेष सन्मान करण्यात आला होता. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.
लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*#संजीव_वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
@@@@''''@@@@@@@@##@@@@
.
*लता*
सुरांच्या वर्तुळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाह्त्या काळातला निमिषा-निमिषातला लक्षांश पकडणारा असा हा लताचा गळा आहे.
आणि म्हणूनच तिच्या गीतातले शब्दच नव्हे तर व्यंजनमुक्त स्वरही किती आशयगर्भ वाटतात, लता "धीरेसे आ जा" म्हणून लोरी गाते, पण "आ जा"नंतरचा तो स्वरांचा हलकासा शिडकावा लयीच्या अशा जागेवरून उठतो की, त्याने कसल्यातरी परतत्वाचा स्पर्श केल्यासारखा वाटतो.
होनाजीच्या भूपाळीतल्या "आनंदकंदा प्रभात झाली"मधे वरच्या षड्जावर 'ई'कार लागला आहे तो असाच सुराची सुई घुसल्यासारखा, "कैसे दिन बीते कैसी बीती रतियां" मध्ये 'हाये' वर अशीच एक सुरांची पखरण आहे. अशी किती म्हणून उदाहरणे दाखवायची! माडगूळकरांच्या 'जोगिया' कवितेतल्या नायिकेच्या गळ्यातून सूर उमटल्याचे वर्णन त्यांनी "स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी" असे केले आहे. लताचे कुठलेही गीत ऐकताना मला ही ओळ आठवते. तिने गायलेले प्रत्येक गीत हे स्वरलतेवरचे फूलच आहे.
देवटाक्याच्या पाण्यासारखा हा गळा. हा स्वरच मुळी परिसाचा धर्म घेऊन आलेला. त्या स्वराचा स्पर्श झाला की कशाचेही सोनेच व्हायचे.
आपल्या जीवनाचे स्वरमय अलगूज करणारी ही कलावती। तिच्या गाण्याला कुठलीही फूटपट्टी लावून ते मोजता येत नाही. त्या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. चांदण्याची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला "तत् त्वम् असि" असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे। सूक्ष्म लयतत्व पाहाणारी ही नजर आहे. चैतन्याने उजळलेला सूर, त्याला कोमेजणे ठाऊक नाही.
लताच्या सुरांनी जिंकलेले हे केवढे मोठे साम्राज्य आहे ! या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. सकाळ उजाडते। घरोघरीचे रेडियो लागतात. एखाद्या रेडियोवरून बातम्या ऐकू येत असतात; युद्धाच्या, दंगलीच्या, जाळपोळीच्या, सत्तेच्या उलथापालथीच्या, मन विषण्ण करणाऱ्या, जगणे म्हणजे हेच का शेवटी असा प्रश्न उभा करणाऱ्या ---- आणि अंधारातून प्रकाशरेखा जावी, तसा एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले तरी हे सूर ऐकायला जगले पाहिजे, असे वाटायला लागते. अतिपरिचयानेदेखील अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे लताचे सूर !
आज इतकी वर्षे असंख्य अंत:करणांतून "बस्स ! ह्या सुरांना सलाम आहे" अशी दाद घेण्याचे भाग्य लताला लाभले आहे। याहीपेक्षा ती दाद देण्याचे भाग्य आम्हांला लाभले आहे.
लताच्या शेकडो स्वरांची ही सुखाची ठेव कुठे ठेवायची?
ती स्मृतिवरि लिहावी, आणि ते ऋण इथेच ठेवून जायचे !
-- पु ल देशपांडे (एप्रिल १९६७ : लता मंगेशकरांच्या गायनाला २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हाचा लेख)
Comments
Post a Comment